शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्कफोर्स ची नवीन नियमावली सादर…….!
मुंबई दि.6 – गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असून आभासी माध्यमातून शिक्षण सुरू आहे. मात्र, शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची निकड शिक्षक आणि पालक सर्वांनाच लक्षात आली असून त्यादृष्टीने शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सने नवी नियमावली सादर केली आहे.
बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सने यात अनेक नवे बदल सुचवले आहेत. शाळांचे दिवस, शाळांमधले तास, मधली सुट्टी यात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक बदल सुचवण्यात आलेत. तसेच शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक उभारण्याचीही सूचना करण्यात आलीय. शाळा सुरू करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली आहे. मुलांना कायम घरात ठेवता येणार नाही, असे टास्कफोर्सने म्हटले आहे. विद्यार्थी घरी राहिल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर भरपूर परिणाम होत आहे. तसेच मोबाईलचा वापर वाढल्यामुळे इतर समस्या देखील खूणावत आहेत. तसेच मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाल्यामुळे त्यांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यात तणावाच वातावरण पाहायला मिळत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आवश्यक ती दक्षता घ्यावीच लागणार असल्याने प्रत्येक शाळेत एक स्कूल क्लिनिक असावे, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. कोरोनाची लक्षणे कोणती आहेत हे आता बहुतांश सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पालकांसाठी विशेष सूचना आहे की मुलांमध्ये ताप किंवा कोरोनाची अन्य लक्षणे दिसल्यास त्यांना शाळेत पाठवूच नये. कोरोनानंतर 14 दिवसांनी विद्यार्थी पुन्हा शाळेत उपस्थित राहू शकतो. एवढेच नाही तर शाळेत मुलं आजारी पडल्यास थेट रुग्णालयात दाखल करण्यात यावे,असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एका वर्गातील मुलांची संख्या कमी करा, दोन शिफ्टमध्ये शाळा चालवा, एक दिवसाआड उपस्थिती, दोन बेंचमधील अंतर वाढवा, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करा, एसी वर्गांना परवानगी देऊ नका, एसी स्कूलबसला परवानगी नाही, टॉयलेट, व्हरांडा, परिसर रोज दोनदा निर्जंतुकीकरण करा, एका रिक्षातून मुले कोंबून पाठवू नका, मुलांना एकत्र जेवायला पाठवू नये, खो खो, कबड्डीसारखे संपर्क येणारे खेळ नकोत, मुलांची रोज तपासणी करण्याचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे इत्यादी सूचना करण्यात आल्या आहेत.