हवामान
बीड जिल्ह्यातील ”या” गावात घराघरात कंबरेएवढे पाणी, संपूर्ण गावाला पडला पाण्याचा वेढा…..!
डी डी बनसोडे
September 7, 2021
गेवराई दि.७ – तालुक्यातील मारफळा येथील साठवण तलाव फुटल्याने या तलावाखाली असलेले चोपड्याचीवाडी गाव पुर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे. परिणामी या गावात पाणीच पाणी झाले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराघरात कंबरेऐवढे पाणी असल्याने घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते.
मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. रविवारी गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा, शेकटा व खोपटी तांडा येथील तीन तलाव फुटले होते. तर आज मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील पुन्हा भेंड खुर्द, भेंड बुद्रुक व मारफळा येथील तलाव फुटले.तलाव फुटल्याने या तलावाखालील चोपड्याचीवाडी पुर्णतः पाण्यात गेली आहे. गावाला पुर्णपणे पाण्याचा वेढा पडला असून घराघरात पाणीच पाणी झाले आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले असून संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सध्या संपुर्ण गावात पाण्यात गेल्याने येथील नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आसुन प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक नागरिक आपला जीव वाचवण्याकरता गावाबाहेर पडले आहेत. तर काही नागरिक जीव मुठीत धरून असल्याचे सांगितले जाते. रात्रभर ग्रामस्थांना या संकटाशी झुंजावे लागणार असून आणखी पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने चिंता वाढली आहे.