बीड दि.११ – कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने गृह विभाग, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक अन्वये सार्वजनिक गणेशोत्सव 2021 करिता मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. श्री गणेश उत्सवादरम्यान “मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे” असे आदेश पारित करण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही आगामी सार्वजनिक गणेशोत्सव 2021 कालावधीमध्ये गणेश उत्सवासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच सर्व संबंधीतांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकुण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने सदरील आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच शासनाने गणेश उत्सव संदर्भात वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सुचनांची अंमलबजावणी होण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागु करण्यात येत आहेत. सदरचे आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीत दि.10.09.2021 रोजीचे 06.00 ते दि.20.09.2021 चे 24.00 वाजेपर्यंत लागू राहतील.