
केज दि.११ – पोलिसांनी नाव्होली येथे छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १० जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नाव्होली येथील सम्राट नावाच्या हॉटेलजवळ पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार दादासाहेब सिध्दे, पोलीस नाईक अशोक नामदास, बाळासाहेब अहंकारे, राजू गुंजाळ यांच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. यावेळी गावातीलच १० जण विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून वरील १० जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेप हे करीत आहेत.