केज दि. ११ – भोगजी ( ता. कळंब जि. उस्मानाबाद ) येथील भीमराव रंगनाथ खराटे ( वय ५० ) या इसमाचा २५ मे २०२१ रोजी मांगवडगाव ( ता. केज ) येथील विहिरीत मृतदेह आढळून आला होता. त्याचा पत्नी, मुलासह तिघांनी घातपात केल्याचा संशय मयताच्या भावाने व्यक्त करीत न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी न्यायालयाच्या आदेशावरून युसुफवडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब तालुक्यातील भोगजी येथील भीमराव रंगनाथ खराटे ( वय ५० ) यांचा मृतदेह २५ मे २०२१ रोजी केज तालुक्यातील मांगवडगाव येथील धनराज विठ्ठल थोरात यांच्या विहिरीत आढळून आला होता. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मयत भीमराव खराटे यांचा त्याची पत्नी राधाबाई भीमराव खराटे, मुलगा सिद्धेश्वर भीमराव खराटे, बबन खराटे या तिघांनी संगनमताने घातपात करून मृतदेह विहिरीत आणून टाकल्याचा संशय व्यक्त करून या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत भीमरावचा भाऊ बालाजी रंगनाथ खराटे यांनी केजच्या न्यायालयात केली होती. या प्रकरणी न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश युसुफवडगाव पोलिसांना दिले. त्यानुसार बालाजी रंगनाथ खराटे यांच्या फिर्यादीवरून मयत भीमराव खराटे यांची पत्नी राधाबाई खराटे, मुलगा सिद्धेश्वर खराटे, बबन खराटे या तिघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे पुढील तपास करत आहेत.