क्राइम
गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास केज पोलिसांनी केले जेरबंद……..!
केज दि.१३ – एका सेवानिवृत्त शिक्षकास गुंगीचे व नशाकारक औषध खाण्यापिण्यातून देऊन हातातील दोन अंगठ्या व खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
केज तालुक्यातील टाकळी येथील निवृत्त शिक्षक त्रिंबक दादाराव घुले ( वय ६९ ) हे २० जुलै रोजी केज शहरात आले होते. ते दुपारी १ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वसुंधरा बँकेसमोर असताना आरोपी बंडू उर्फ माणिक सिरसट ( रा. आरणगाव ता. केज ) याने ओळख काढून त्यांना चहापाणी करीत खाण्यापिण्यातून गुंगीचे व नशाकारक औषध देऊन त्यांना उमरी रस्त्याने नेले होते. तिकडे ते बेशुद्ध झाल्यानंतर जवळपास कोणी नसल्याची संधी साधून सिरसट याने त्यांच्या हाताच्या बोटातील ५ ग्रामच्या दोन अंगठ्या व खिशातील २ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. २७ जुलै रोजी त्रिंबक घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडू उर्फ माणिक सिरसट याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत होते.
तर अवघ्या कांही दिवसातच पेढ्यात गुंगीचे औषध घालून प्रसाद म्हणून एका महिलेस लुटत त्यांच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याची घटना केज शहरात घडली होती. केज शहरातील मंगळवार पेठ भागातील छाया मुकुंद वाकळे ( वय ४८ ) ही महिला २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते १२.४५ वाजेच्या सुमारास शहरातील सुहाना हॉटेल व देशी दारू दुकानाच्या समोरील रस्त्यावर जात होती. याचवेळी माणिक त्रिंबक सिरसाट ( रा. आरणगाव ता. केज ) व एका अनोळखी साथीदाराने पेढ्याचा प्रसाद म्हणून छाया वाकळे यांना दिला होता.
दरम्यान सदरील प्रकरणी माणिक त्रिंबक सिरसाट यास दि.१२ रोजी अरणगाव येथून एपीआय संतोष मिसळे व सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दि.१६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.