क्राइम
गर्भवती महिलेची आत्महत्या, केज तालुक्यातील दुर्दैवी घटना…..!
केज दि.१३ – हुंड्याचे राहिलेले पैसे घेऊन ये म्हणून होत असलेल्या सासु सासरे आणि पतीच्या जाचास कंटाळून गर्भवती असलेल्या पोलीस कर्मचार्याच्या पत्नीने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे घडली. आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ज्योती गोविंद जाधवर या महिलेचे 2018 मध्ये लग्न झाले होते. सदरील महिलेचा पती गोविंद वचिस्ट जाधवर उस्मानाबाद येथे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी ज्योती हिचा सासरच्या लोकांकडून पैशासाठी छळ केला जात असे. शुक्रवारी या महिलेस तिच्या पतीने हुंड्यातील राहिलेले आठ लाख रुपये घेऊन ये म्हणून माहेरी सोडून गेला होता. परंतु रविवारी सदरील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, सदरील प्रकार नांदूरघाट येथील पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, जयवंत शेप, शेख रशीद यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सदर प्रकरणी पती व सासू सासऱ्या विरोधात केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांमुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला असून या प्रकरणी दोषीं विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.