करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला……!
बीड-मंत्री धनंजय मुंडेंविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जामिन अर्जावर सुनावणीसाठी आजची तारीख देण्यात आली होती. मात्र ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार होती त्या न्यायाधिश रजेवर असल्याने आज न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी शनिवार (दि. १८ ) रोजी ठेवली आहे. त्यामुळे शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत करुणा शर्मा उर्फ करुणा मुंडे परळीत आल्या होत्या. मात्र याठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.करुणा शर्मा यांनी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणीसाठी मंगळवार (दि.१४) ची तारीख देण्यात आली होती. मात्र ज्या अति. जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती सापत्नीकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे, त्या न्यायाधिश आज रजेवर होत्या. त्यामुळे आता या प्रकरणात १८ तारिख देण्यात आली आहे.