रॅगिंग प्रकरणी दोन मुलींसह एका शिक्षकावर गुन्हा दाखल…….!
नांदेड दि.१६ – जिल्ह्यातील हदगाव येथील पौळ नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार घडल्याचं समोर आलंय. महाविद्यालयातील एक शिक्षक व इतर दोन विद्यार्थिनीनी त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि इतर दोन मुलींवर रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील गोविदराव पौळ नर्सिंग कॉलेजातील शिक्षक भगिरथ शिंदे आणि हॉस्टेलमधील दोन मुलींनी त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या व हॉस्टेलला राहत असणाऱ्या विशिष्ट समाजातील मुलीचे रॅगिंग केलं आहे. आपल्यासमोर नाक घास असं म्हणत त्या मुलींनी छेडछाड केल्याचाही प्रकार घडला आहे. पीडित मुलीला कपडे काढ, झाडू मार असा आदेश देत सगळी कामं जबरदस्तीनं करून घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत रॅगिंग केल्याच उघड झालंय.पौळ नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमधील या कृत्याची तक्रार करण्यासाठी फर्यादी मुलगी जेव्हा भगीरथ शिंदे यांच्याकडे गेली असता त्यांनी वाईट उद्देशाने नको त्या भागाचा स्पर्श केला व तू हलक्या जातीची आहेस, तुला काम लावले तर काय झालं असं म्हटल्याचं त्या मुलीने आपल्या फिर्यादीत सांगितलं आहे. या प्रकरणाची इतर कुठे तक्रार केल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकीही दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
या प्रकरणी पोलिस ठाणे हदगाव येथे गुन्हा क. रजिस्टर 253/2021 भादवी कलमानसार 354 सह अनुसुचित जाती जमाती अधिनियम प्र अधिकलम 3 (1) (आर) (डब्यलु) (1) (2) सह महाराष्ट्रात छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम 1999 कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.