आपला जिल्हा
मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावा लागला…….!

गेवराई दि.२४ – 12 वी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र पोलिस पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. गावालगत असलेल्या नदीवरील पूलच मागील महिण्यात वाहून गेल्याने रहदारीचा रस्ता बंद आहे. त्यामुळे सदरील मुलीचे प्रेत नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागली. ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील आहे.सदरील घटना शुक्रवारी दुपारी घडली. निकिता दिनकर संत (वय 17) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच गेवराई तालुक्यातील चोरपुरी येथील एका आजारी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातील चिखलात गाडी फसल्याने महिलेचा उपचाराअभावी गाडीतच तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यानंतर धुमेगाव जवळील हनुमान नगर येथील एका महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात घेऊन जाताना गाडी रस्त्यात फसल्याची घटना घडली होती. यावेळी मात्र ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून सदरील गाडी बाहेर काढल्याने अनर्थ टळला होता. यामुळे गेवराई तालुक्यातील खराब रस्त्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी भोजगाव येथील निकिता दिनकर संत हिने आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र शवविच्छेदनासाठी मृतदेह रस्त्याअभावी नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागल्याने रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भोजगाव लगत असलेल्या अमृता नदीवरील पुल गत महिण्यात आलेल्या पुरात वाहून गेला होता. तेव्हापासून येथील ग्रामस्थांना रस्त्याअभावी नरकयातना भोगाव्या लागत आहेत.