संपादकीय
केज तालुक्यातील ”या” चार वस्त्यांसह तीन ते चार गावांचा संपर्क तुटला……!

केज दि.२६ – तालुक्यातील शिरपुरा गावच्या बाजूने वाहत असलेल्या नदीवरच्या पुलासाठी लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. या गावातील सुमारे 75% लोक नदीच्या पलीकडे असलेल्या चार वस्त्यांवर राहतात. त्यामुळे मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपर्क तुटला आहे.
शिरपुरा गावच्या वरच्या बाजूस असलेला जाधव जवळा तलाव भरल्याने खालच्या भगत पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे लोकांना याचा प्रचंड मोठा फटका बसत आहे.दरवर्षी पावसाळ्यात लोकांना जिव मुठीत धरुन नदीच्या पलीकडे जावं लागतं. मागच्या काही वर्षांपूर्वी या नदीच्या पात्रातून जात असताना अनेक जनावरे वाहुन गेली आणि काही लोक सुध्दा जाता जाता वाचवली गेली. शेतात काम करण्यासाठी जायला पुल नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. प्रत्येक वर्षी असचं चालू राहिल्यास लोकांना आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे.

दरम्यान, शिरपुरा गावातून हांगेवस्ती, वनवेवस्ती, केदारवस्ती, घुले वस्तीसह केवड, काळेगाव,जाधवजवळा या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे बोभाटी नदीवर पुल बांधण्याची मागणी शिरपुरा ग्रामस्थ करत आहेत. तर तालुक्यातील चिंचोली माळी येथील वरपगाव, उत्तरेश्वर पिंप्री, कापरेवाडी, नांदूर कडे जाणारा पूल वाहून गेल्याने धोका निर्माण झाला आहे.