मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार ते अतिमूसळधार…….!
मुंबई दि.27 – गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणवण्याची दाट शक्यता आहे. विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे. पुढचे 4 दिवस राज्यांतल्या विविध भागांत कमी अधिक प्रमामात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं.
बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ काल रात्री( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकलं. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर आजपासून पासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वारे वाहतील. कोकणात 28 सप्टेंबर पर्यंत वाऱ्याचा वेग वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधागिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
दरम्यान, आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिगोंली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.