काँग्रेसच्या रजनीताई पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला मिळाली खासदारकी…..!
मुंबई दि.27 – काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या रजनीताई पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 23 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती. भाजपनेही काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली होती. यामुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या परंपरे नुसार निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती काँग्रेस ने केली होती. त्यानुसार भाजपने अर्ज मागे घेण्याचे घोषित केल्याने रजनीताई पाटील बिनविरोध राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाले आहे.
बिनविरोध निवड झाल्याचे समजताच केज शहरात फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.