हवामान
पुरात वाहवली चारचाकी तर अंबाजोगाई चा संपर्क तुटला…….!
केज दि.28 – धारुर ते अंबाजोगाई रस्त्यावरील आवरगाव येथील वाण नदीला रात्री मोठा पुर आला असून अद्यापही पुलावरुन पाणी वाहत आहे. रात्री बीडहून लातूरकडे जाणारी चारचाकी गाडी या पाण्यात 200 मीटर वाहुन गेली होती मात्र सुदैवाने गाडीतील तिघांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या आडस, अंबाजोगाईचा संपर्क तुटलेला असून सर्व वाहतूक बंद आहे.
धारुर तालुक्यातही आठवडाभरापासून पाऊस सुरु असून कालपासून सततधार सुरु आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. अनेक पुलं वाहून गेली असून गावा गावात पाणी साचले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोनीमोहा, व्हरकटवाडी, कोळपिंपरी, गांजपूर, चिंचपूर, ढगेवाडी, पहाडी दहीफळ, जागिर मोहा, मोरफळी, मोहखेड आदी गावांचा संपर्क तुटलेला आहे. रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत आहे तर पाण्यामुळे अनेक रस्ते वाहून गेली आहेत.
दरम्यान, धारुर शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या राज्य रस्त्यावरील आवरगाव येथे वाण नदी दुथडी भरुन वाहत आहे. आवरगावच्या नळकांडी पुलावरुन जवळजवळ 6 फुट पाणी वाहत आहे. रात्री बीडहून लातूरकडे जाणाऱ्या कारचालकास पाण्याचा अंदाज न आल्याने कार क्र.एमएच 24 बीएल 1703 ही दोनशे मीटर वाहुन गेली होती. कारमधील तिघे तात्काळ गाडीतून बाहेर पडल्याने सुदैवाने अनर्थ टळला.
तर केज तालुक्यातील आनंदगाव सा येथे चार गायी वाहून गेल्याची घटना घडली आहे.