संपादकीय
घाबरू नका आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत – खा.रजनीताई पाटील……!
डी डी बनसोडे
September 29, 2021
केज दि.२९ – काँग्रेसच्या नेत्या व नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांनी खासदारकीची शपथ घेण्या अगोदर जिल्ह्यात येत शेतकऱ्यांच्या, माता माऊलींच्या संकटात धावून येऊन सांत्वन केले व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
खासदार रजनीताई पाटील यांनी दि.२९ रोजी केज तालुक्यातील नायगाव येथून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व कुटुंबातील सदस्यांना भेटून आधार देत रेशन, लाईट अशा आवश्यक असलेल्या सूचना प्रशासनाला तातडीने दिल्या. तसेच कोणतेही पंचनामे न करता आता मदत लवकरच पोहोच करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. अनेकांचे घर, संसार उघड्यावर आले आहेत, घरात खायला काही शिल्लक राहिल नाही, जनावरे वाहून गेलीत, शेतात फक्त पाणीच वाहत आहे असे हे विदारक चित्र मी ३९ वर्षात पहिल्यांदा पाहतेय अशा शब्दांत रजनीताई पाटील यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. परंतू घाबरू नका राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या सर्व उपाययोजना तातडीने देण्यात येतील व शेतकऱ्यांना देखील लवकर मोठ्या प्रमाणावर मदत देण्यासाठी मी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बोलून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी कळंब – अंबाजोगाई राज्य रस्त्यावर असलेल्या सावळेश्वर च्या पुलाची पाहणी केली. हा पुल अतिशय कमकुवत झाला असून त्याचा कधीही धोका संभवतो. याबाबत रजनीताई पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांना तिथूनच फोन लावून या पुलाबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी जेणे करून हा अतिशय महत्त्वाचा व मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. सौंदणा येथेही भेट दिली असता तिथे जवळपास १०० महिलांशी संवाद साधून तात्काळ या महिलांना जीवनावश्यक वस्तू पोहच करण्याच्या सूचना त्यांनी महसूल अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही तात्काळ बोलून प्रश्न सोडवण्यासाठी तातडीचे प्रयत्न करण्याचे सांगितले.
पैठण सावळेश्वर येथे पुरात वाहुन गेलेले घरावरचे पत्रे जमा करून पुन्हा मोडका संसार उभारण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना एक ७५ वर्षाच्या आजीची रजनीताई यांनी भेट घेतली.तसेच या गावातील कुटुंब एक दिवसा पासून उपाशी असून सरपंच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत असल्याची माहिती खा. रजनीताई पाटील यांच्या समोर कथन करताना असहाय्य महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले. मात्र रजनीताई यांनी त्यांना धीर देत घाबरू नका आम्ही आहोत, तुमची सर्वजण काळजी घेतील असे सांगून त्या आज्जीला लवकर मदत करावी अशा सूचना नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनाही दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, श्रीनिवास बेदरे, हनुमंत मोरे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, बहादूर भाई परळी, अमर पाटील, कपिल मस्के, कबिरोद्दीन इनामदार, दलिल इनामदार, सुजित सोनवणे, कविता कराड, शारदा गुंड, संगीता साळवे, अमोल डोईफोडे, शरद नाईकवाडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.