क्राइम
खून प्रकरणातील चौघे आरोपी केज पोलिसांच्या ताब्यात……!
केज दि.30 – चोरीच्या संशया वरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका पारधी समाजातील युवकाचा मृत्यू झाला. त्या प्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलीसांनी चार आरोपी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दि. २८ रोजी रात्री १२.३० वा च्या दरम्यान फिर्यादी सरवस्ती शिवाजी काळे हिने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा नवरा शिवाजी नामदेव काळे, भाऊ दीपक अशोक शिंदे व मावस भाऊ आकाश बापू काळे हे भोपला येथील सोयाबीन काढणीसाठी पाहणी करून आरणगाव, काळेगाव हनुमंत पिंप्री मार्गे त्यांच्या मोटार सायकल क्र. (एमएच-२५/ए-२२५५) वरून गावाकडे जात असताना ते उत्तरेश्वर पिंप्री येथे आले. त्या वेळी तेथे आरोपी उध्दव माणिक शिंदे, राजेंद्र लाला शिंदे, दिपक राजेंद्र शिंदे, फुलचंद मीट्ठु पवार, विलास माणिक शिंदे व इतरांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशया वरून त्यांना धरून ठेवले. त्या सर्वांनी मिळून फिर्यादीचे पती शिवाजी माणिक काळे उर्फ माखल्या यांना पहाटे ३ पर्यंत जबर मारहान करून ठार मारले. त्या नंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मयत शिवाजी उर्फ माखल्या आणि जखमी यांना ट्रॅक्टरने बोरगाव चौकातील रस्त्याच्या कडेला नेऊन टाकले अशी फिर्याद दिली.
सदर फिर्यादी वरून उध्दव माणिक शिंदे, राजेंद्र लाला शिंदे, दिपक राजेंद्र शिंदे, फुलचंद मीट्ठु पवार, विलास माणिक शिंदे व इतर यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४७१/२०२१ भा.दं.वि. ३०२, १४३, १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी यातील आरोपी उध्दव माणिक शिंदे, राजेंद्र लाला शिंदे, फुलचंद मीट्ठु पवार, विलास माणिक शिंदे रा हनुमंत पिंप्री यांना हनुमंत पिंप्री येथून अटक केली असून दिपक राजेंद्र शिंदे हा फरार आहे. तर उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी दि.29 सप्टेंबर रोजी दिवसभर केज पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. पोलिसांनी तपासात इतर आरोपी निष्पन्न होताच त्यांना ताब्यात घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी गावी जाऊन मयतावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, चार आरोपींना दि. ३० सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.