पॉजिटीव्हीटी रेट पाच च्या पुढे, कांही गावात पुन्हा लॉकडाउन ची वेळ……!
अहमदनगर दि.3 – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. परंतु तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत. मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढलेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 11 तालुक्यांतील 61 गावांचा समावेश करण्यात आलाय.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा यात समावेश आहे. 4 ऑक्टोबरपासून 13 ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आलाय.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव आढळून आलाय. दिवसभरात आज नगरमध्ये 424 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. ज्या गावांत 10 पेक्षा जास्त रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये हा लॉकडाऊन लादण्यात आलाय. जिल्ह्यात जवळपास दररोज 500 ते 800 च्या घरात रुग्ण सापडत असून, पॉझिटिव्हिटी रेटही 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.