केज दि.९ – अनोळखी चार चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील लोकांना कुऱ्हाड आणि वाकस याचा धाक दाखवून दागिने, मोबाईलसह नगदी आणि दुचाकी असा १ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना केज तालुक्यातील दिपेवडगाव येथे ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दिपेवडगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारी माणिक आबा कांबळे हे व त्यांचे कुटुंब ८ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण आटपून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप घरात प्रवेश केला. तेवढ्यात कुलूप तोडण्याचा आवाज ऐकून माणिक कांबळे व त्यांच्या कुटुंबातील लोक झोपेतून जागे झाले त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात शिरलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या हातातील धारदार कुऱ्हाड व वाकस याचा धाक दाखवून त्यांना गप्प केले. त्यांनतर चोरट्यांनी घराची झडती घेतली. घरात असलेले महिलांचे दागिने, नगदी आठ हजार रुपये, मोबाईल, घड्याळ, गेटमध्ये लावलेली दुचाकी असा १ लाख ४६ हजार ६०० ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. माणिक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, चोरट्यांनी घरात धारदार कुऱ्हाडीचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना दिपेवडगाव येथे घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा तपास लावून चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी ही ग्रामस्थांतून होत आहे.