मराठवाड्याला 3700 कोटींची मदत……..!
मुंबई दि.16 – अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील आठही जिल्ह्याला बसलेला होता. त्याअनुशंगाने पाहणी, पंचनामे, लोकप्रतिनिधी थेट बांधावर देखील आले. मात्र, राज्य सरकारच्या मदतीनंतर खरचं मराठवाड्यातील पीकाचे नुकसान झाले याचा अंदाज येत आहे. एनडीआरएफ च्या निकषानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले होते तर नुकसानभरपाईसाठी 2585 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी ढळते माप देण्यात आले आहे. 3700 कोटी रुपयांची मदत मराठवाड्याच्या वाटेला येणार आहे.
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन, उडीद ही पीके तर पाण्यातच होती पण शेत जमिनीही खरडून गेल्या होत्या. त्यामुळे नुकसानीची दाहकता सर्वानाच आली होती पण प्रत्यक्षात किती मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. एनडीआपएफ च्या निकषाप्रमाणे 2585 कोटी रुपयांची गरज असल्याचे जाहीर करण्यात आले असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये मराठवाड्याच्या वाटेला 3700 कोटी म्हणजेच एनडीआरएफ च्या निकषांच्या तुलनेत 975 कोटी हे अधिकचे मिळालेले आहेत. त्यामुळे आता या निधीचे वितरण कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, औरंगाबाद विभागासाठी 3700 कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अधिकचे नुकसान हे झाले होते. मात्र, बीड जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 636 कोटींची मदत मिळणार आहे. पावसामुळे पीकांचे तर नुकसान झालेच होते पण शेतजमिनीही खरडून गेल्या होत्या. आता जिरायत, बागायत आणि फळपिकांसाठी वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत. मात्र, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीडला सर्वाधिक मदत मिळालेली आहे.