क्राइम
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करुन परागंदा झालेल्या आरोपीस अटक…….!
पुणे दि.२० – दिनांक २३/०९/२०२१ रोजी बाळासाहेब किसन जाधव, रा. सद्दगुरु कॉलनी, थेरगाव, पुणे याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी सुनिता बाळासाहेब जाधव हिचे डोक्यात हातोडीने वार करून तिला जबर जखमी केले. त्यांची मुलगी काजल जाधव हिचे फिर्यादीवरुन वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. ८०९ / २०२१ भादवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर आरोपी बाळासाहेब जाधव हा अंगात परिधान केलेल्या बरमुडा, बनियन सह पळुन गेला होता.
परंतु गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री कृष्ण प्रकाश सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन यांना आरोपी तात्काळ अटक करणेबाबत आदेशित केले. त्यानुसार डॉ. विवेक मुगळीकर यांनी त्यांचे अधिनस्थ तपास पथकातील सपोनि श्री. संतोष | पाटील, श्री अभिजीत जाधव यांना सुचना व आदेश देऊन तपास पथकातील एकुण ०२ टिम तयार केल्या.
आरोपी बाळासाहेब जाधव हा मोबाईल फोन वापरत नसल्याने व त्याचा कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क नसल्याने आरोपी शोधात अडचणी येत होत्या. सदर आरोपीचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पत्नीपासून त्याने घटस्फोट घेतला आहे. सदर आरोपीचा घरात भांडणे करुन पळून जाऊन अस्तित्व लपविण्याचा पुर्व इतिहास आहे. पहिल्या पत्नी सोबत झालेल्या भांडणामध्ये तो ७ वर्षे फरार होता. त्या वेळी तो कोणाच्याही संपर्कात न राहता खोटे नाव धारण करुन ओळख लपवून कोल्हापुर जिल्ह्यातील एका गावात अनाथ असल्याचे सांगत घरगडी म्हणुन काम करत होता. ७ वर्षानंतर त्याचे गावातील एका त्याचे ओळखीचे व्यक्तीने त्याला पाहिल्यानंतर नातेवाईकांनी त्याला परत त्याच्या मुळगावी आणले होते. त्यानंतर यातील मयत सुनिता बरोबर याचा सन १९९८ मध्ये विवाह झालेला आहे. त्यांना चार मुले आहेत. सन २०१५ मध्ये मयत हिचे बरोबर भांडण करुन आरोपी आंबेगाव खुर्द, पुणे येथील एका गोठ्यात अनाथ असल्याचे सांगत कामास राहिला होता. त्यावेळी तो ३.५ वर्षे आपले अस्तित्त्व लपवून राहिला होता. अशा प्रकारे आरोपी घरातून पळून जाऊन आपले अस्तित्त्व लपविण्यात तरबेज होता. दोन्ही वेळा फरार असताना त्याने कोणत्याही नातेवाईकाशी | संपर्क केला नव्हता. त्याच बरोबर आरोपी हा गवंडी, प्लंबर, पेंटिंग, वॉटर प्रुफिंगचे कामे करत असल्याने त्याला रोजगार मिळणेत अडचणी येणार नव्हत्या. त्यामुळे अशा आरोपीला पकडणे अवघड काम होते.
त्या दरम्यान दिनांक २९/०९/२०२१ रोजी सुनिता बाळासाहेब जाधव यांचा उपचारा दरम्यान ससून हॉस्पीटल पुणे येथे मृत्यु झाला. त्याप्रमाणे गुन्ह्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यात जाऊन आरोपीचा शोध घेतला. तसेच आरोपीचे फोटोसह वॉन्टेड पत्रके तयार करुन ते शहरातील मजुर अड्डे, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, रिक्षा स्टँड, हॉस्पीटल इत्यादी गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आली. तसेच आरोपी याने यापुर्वी ज्या ठिकाणी काम केले होते, त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात आली. तयार करण्यात आलेली तपास
टिम मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रत्येक लहान लहान बाबींवर तपास करत होते. त्यातच आरोपी मोबाईल फोन, बँक अकाऊंट (एटीएम) वापरत नसल्याने तांत्रिक तपासाव्दारे आरोपीची माहिती मिळणे शक्य नव्हते.
सर्व टिम तपासाच्या सर्व त्या उपायोजना योजून आरोपीस अटक करण्यासाठी दिवस रात्र कसोशीचे प्रयत्न करत असताना दिनांक ११/१०/२०२१ रोजी पोलीस अंमलदार प्रशांत गिलबिले यांना त्यांचे | बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नवले ब्रिजजवळ, कात्रज येथे पुर्वी तो काम करत असलेल्या ठिकाणी | आरोपीच्या वर्णनाशी मिळता जुळता इसम आला आहे. सदरची बातमी मिळताच पोलीस अंमलदार प्रशांत गिलबिले यांनी सपोनि श्री. संतोष पाटील, श्री अभिजीत जाधव यांना कळविली असता सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विवेक मुगळीकर यांना कळवून सपोनि श्री. संतोष पाटील व श्री अभिजीत जाधव हे तपास पथकातील अंमलदार यांचेसह नवले ब्रिज या ठिकाणी पोहचले. त्यावेळेस तो तेथून निघुन गेला होता.
नवले ब्रिज, कात्रज या ठिकाणी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संयम राखत १० तास सापळा रचुन आजूबाजूचा परिसर पिंजून काढून आरोपीचे वर्णनाशी मिळता जुळत्या इसम दिसून आल्यावर त्याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्यास नाव, पत्ता विचारता त्याने तोच बाळासाहेब किसन जाधव, वय ५१ वर्षे, रा. सद्गुरु कॉलनी, थेरगाव, पुणे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने चारित्र्याचे सशयावरुन पत्नीचा खून केल्याचे कबूल केले. आरोपीस दिनांक ११/१०/२०२१ रोजी अटक करण्यात आली असून त्यास दिनांक १७/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे.
दरम्यान, सदरची कारवाई कृष्ण प्रकाश सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे सो. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, आनंद भोईटे सोो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, पिंपरी चिंचवड, श्रीकांत डिसले सो. सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे | मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाकड पोलीस ठाणे, सपोनि संतोष पाटील, सपोनि अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप, पोलीस अंमलदार प्रशांत गिलबीले, बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, वंदु गिरे, प्रमोद कदम, अतिष जाधव, विजय वेळापुरे, कल्पेश पाटील, बाबा चव्हाण, कौतेय खराडे, तात्या शिंदे व नुतन कोंडे यांनी मिळुन केली आहे.