‘हे’ दोन देश पुन्हा लॉक डाउन च्या उंबरठ्यावर……!
बीड दि.२२ – भारतासह जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. यामुळे राजधानी बीजिंगसह अनेक शहरांमधील विमान सेवा अचानक बंद केली आहे.शाळा, चित्रपटगृहे बंद करून कडक निर्बंध लावण्यात आले असून काही ठिकाणी लॉकडाऊनही सुरू केला आहे.
2019 च्या अखेरीस चीनमधूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरला. दीड वर्षे कोरोनाच्या दोन लाटा आल्या. जगभरात लाखो लोकांचा बळी गेला. आता व्यवहार सुरू झाले असतानाच जगाची चिंता वाढविणारी बातमी चीनमधून आली आहे. चीनच्या उत्तर आणि पश्चिम भागात कोरोना रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यात प्रामुख्याने राजधानी बिजिंग, शांघाई ही प्रमुख शहरे आहेत. तसेच शिआन, गांसू प्रांत, इनर मंगोलिया या भागाचा समावेश आहे.
बिजिंग आणि किमान पाच प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले असून शेकडो विमानांची उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत. शाळा, चित्रपटगृहे बंद करून काही भागांत लॉकडाऊन लागू लावण्यात आला आहे. या नवीन लाटेत वृद्धांना झपाटय़ाने संसर्ग होत असल्याने त्यांना घराबाहेर पडण्यास निर्बंध केले असून कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत.
दरम्यान, रशियातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मृतांची संख्या रोज एक हजारांवर गेली आहे. मंगळवारी 28 हजारांवर नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्ग आटोक्यात न आल्यास रशियात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.