शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव पुन्हा आला समोर……!
मुंबई दि.27 – ठाकरे सरकारच्या निर्णायातील गोंधळ पुन्हा एकदा राज्यासमोर आला आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्ट्यांचा निर्णय शासनानं अचानक बदलला आहे. परिणामी सर्व अधिकारी आणि व्यवस्थापक गोंधळात सापडले आहेत. आधी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या असतील असं परिपत्रक संचालक शालेय शिक्षण विभाग पुणे यांनी काढले होते. मात्र या निर्णयात आता बदल करण्यात आले आहेत.
राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शासनानं बदल केले आहेत. आता राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान असणार आहेत. परिणामी सर्व शाळांना आपापल्या प्रथम सत्र परिक्षांचं नियोजन बदलण्याची वेळ आली आहे. पुर्वीच्या सुट्ट्या गृहीत धरून अनेक शाळांनी आपापले वेळापत्रक बनवलं होतं पण अचानक शासनानं हा निर्णय घेतल्यानं शाळा व्यवस्थापन अडचणीत सापडलं आहे.
दरम्यान, काही शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावी वर्गाच्या प्रथम सत्राच्या परिक्षा सध्या चालू आहेत. तर काही शाळांनी या परिक्षा 30 ऑक्टोबरनंतर घेण्याचं ठरवलं होतं पण या निर्णयानं नियोजन बिघडलं आहे. राज्य सरकारच्याच विभागांमध्ये समन्वय नसल्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. परिणामी आता सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना शाळांना आपलं वेळापत्रक बदलावं लागणार आहे.