राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केले अटक……..!
मुंबई दि.२ – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्या प्रकरणात ईडीने तपास सुरू केल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, चौकशी सुरू असताना अनेक वेळा अनिल देशमुख यांना समन्स बजावण्यात आला होता.
वारंवार अनिल देशमुख हे वयाची व तब्येतीची कारणं देत चौकशीला गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांच्या नावे लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. परंतु अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचं पाहायला मिळत होतं. आता अचानकच अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात काल सकाळी 11:30 च्या सुमारास चौकशीसाठी हजर झाले.अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात तब्बल 13 तास चौकशी झाली. त्यानंतर वेगवेगळ्या कलमान्वये त्यांच्यावर अटकेची कारवाई ईडीने केली आहे. दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात असून आज सकाळी त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे
दरम्यान, काल झालेल्या 13 तासांच्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख चौकशीला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते, अशी माहिती देखील समोर येत आहे. त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने तब्बल पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीला गैरहजर राहिले होते. दरम्यान, यापूर्वी अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता अनिल देशमुखांवरही अटकेची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.