अंबाजोगाई च्या रुग्णालयाच्या कोरोना वार्डातील अनुभव ”व्हायरल”……!
बीड दि.16 – एकीकडे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी धडपड करत असताना दुसरीकडे ‘अंबाजोगाईचं वैभव’ म्हटंल जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. या रुग्णालयातील व्यवस्थेचा पंचनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेखक बालाजी सुतार यांनी आलेले अनुभव फेसबुकवर व्यक्त केले आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
बालाजी सुतार यांच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून ते रुग्णालयातील असुविधांचा पंचनामा बालाजी सुतार यांनी केला आहे. कोरोना चाचणी करण्यापासूनच्या ढिसाळ कारभाराची प्रचिती येत असल्याचे अनुभव त्यांनी सांगितले. बालाजी सुतार यांच्या वडिलांची तीस ऑक्टोबरला अॅन्टिजेन टेस्ट केली, त्यासोबतच आईचाही आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वॅब दिला होता. मात्र, दोन तारखेच्या संध्याकाळी त्यांना आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. स्वॅब नमुना घेतल्यानंतर तिथल्या लोकांकडून तो प्रयोगशाळेकडे पाठवायचाच राहून गेला. दोन ऑक्टोबर रोजी ही बाब तेथील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. विशेष म्हणजे रुग्णालयातच हा स्वॅब नमुना चाचणीसाठी पाठवायचा होता.
तसेच संसर्ग फैलावू नये यासाठी कोविड वॉर्डमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करण्यास मज्जाव असल्याची सूचना रुग्णालयात लावण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाबाधित रुग्णांच्या सलाईनवर लक्ष ठेवण्यापासून इतरही कामे करण्याची सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे सुतार यांनी सांगितले. पेशन्टला ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या ‘ह्युमिडीफायर’ नावाच्या यंत्रातलं ‘पाणी’ बदलण्याचे कामही रुग्णांच्या नातेवाईकांना करावे लागत असल्याचा अनुभव त्यांनी मांडला. कोविड-5 मधल्या त्या चौदा बेड्सच्या मोठ्या खोलीमध्ये किमान चार नातेवाईक असे होते की ते केवळ एका मास्कच्या भरवशावर आपल्या पेशन्टच्या शेजारच्या रिकाम्या बेडवर दिवसभर बसून आणि रात्रभर झोपून असत, असेही बालाजी सुतार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले. रुग्णांच्या नातेवाईकांना वॉर्डबाहेरील जागेत रात्रभर फिरणाऱ्या डुक्कारांच्या आणि कुत्र्यांच्या गराड्यात झोपावे लागत असे.
दरम्यान, कोरोनासारख्या सबंध जगाला दहशतीच्या छायेत आणलेल्या साथरोगाला अटकाव करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या कोविड-5′ वार्डमधलं एकूण चित्र काय आहे, आणि त्यातून लोकांच्या जीवाला काय प्रकारचा धोका उत्पन्न होऊ शकतो, हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न असल्याचे बालाजी सुतार यांनी म्हटले आहे.