राज्यसरकारचा मोठा निर्णय, नातेवाईकांना मिळणार पन्नास हजार रुपये…..!
मुंबई दि.२६ – राज्यात कोरोना संसर्गामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. काम करणारी तसेच कुंटुंबप्रमुख व्यकतींचा या कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाला. अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी देण्यात येईल.
राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरीता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे; तसेच एखाद्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास पन्नास हजार रुपये सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. राज्य आपत्ती मदत्त निधीमधून ही मदत करण्यात येईल. हे सानुग्रह सहाय्य देण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोरोना या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.
दरम्यान, या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच या योजनेची माहिती आणि कार्यपद्धतीची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील. संबंधित सर्वांनी अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.