आपला जिल्हा
बीड जिल्ह्यात गुगल अर्थचा वापर करून होणार जि. प. गट आणि गण रचना……!
बीड दि.१५ – बीड जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या ९ ने वाढल्यानंतर आता सर्वांनाच गट आणि गण रचनेचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील ११ पैकी ९ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ गट वाढणार असल्याने नेमकी गट आणि गण रचना कशी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आता यासंदर्भात निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने निर्देश स्पष्ट केले आहेत. गट आणि गण रचनेसाठी गुगल अर्थचा वापर करावा लागणार असून गेवराई तालुक्यापासून गट रचना सुरु होऊन ती अंबाजोगाई तालुक्यात संपणार आहे.
बीड जिल्हा परिषदेत ९ गट तर ११ पंच्यातसमित्यांपैकी ९ मध्ये तब्बल १८ गण वाढणार असल्याने जवळपास सर्वच जुन्या गट आणि ग्णांमध्ये फेरबदल अपेक्षित आहेत . हे गट आणि गण नव्याने तयार करावयाचे असल्याने जुन्या गटातील काही गावे लोकसंख्येच्या प्रमाणात काढूनच नवीन गट किंवा गण निर्माण होईल. केवळ धारूर आणि शिरूर तालुक्यात नवीन गट किंवा गण होणार नसल्याने फारसे फेरबदल अपेक्षित नाहीत.
दरम्यान आता जिल्हा प्रशासनाने गट आणि गण क्रमांकाचे स्वरूप स्पष्ट केले असून त्यानुसार गेवराई तालुक्यापासून गट आणि गण रचनेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता ज्या तालुक्यात गट आणि गण वाढलेले आहेत ते लगतच्या तालुक्याच्या सीमेच्या बाजूलाच वाढतील असेच अपेक्षित आहे. गेवराई, माजलगाव , वडवणी, बीड , शिरूर, पाटोदा , आष्टी , केज, धारूर , वडवणी , परळी आणि अंबाजोगाई अशी गट आणि गणांची रचना केली जाणार आहे. त्यामुळे गेवराईतील वाढणारा गट हा माजलगावच्या सीमेवरचा , तर बीडमधील वाढणारा गट हा शिरूरच्या सीमेवरचा असू शकतो. अशाच पद्धतीने रचना येत्या काही दिवसात अपेक्षित आहे.
अशी करायची आहे रचना
नवीन गट आणि गण रचनेसाठी गुगल अर्थचा वापर करावयाचा आहे. या नकाशावर गावांच्या सीमा निश्चित करून लोकसंख्येच्या प्रमाणात एक एक गण आणि गट निश्चित करावयाचा आहे.
असे असतील गट क्रमांक
तालुका गट क्रमांक
गेवराई १ ते १०
माजलगाव ११ ते १७
वडवणी १८ ते २०
बीड २१ ते २९
शिरूर ३० ते ३३
पाटोदा ३४ ते ३७
आष्टी ३८ ते ४५
केज ४६ ते ५२
धारूर ५३ ते ५५
परळी ५६ ते ६२
अंबाजोगाई ६३ ते ६९