ओमायक्रॉन प्रतिबंधासाठी केंद्राकडून राज्यांना विशेष सूचना……!
नविदिल्ली दि.23 – देशात ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे. देशात आतापर्यंत 320 पेक्षा जास्त ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला काही सूचना केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विरोधातली लढाई कायम ठेवावी, त्यासाठी तयार राहावे, धैर्य सोडू नये असा सल्ला केंद्राने राज्यांना दिला आहे.
1- सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत कठोर नियंत्रण सुनिश्चित करा. रात्री संचारबंदी लावा आणि विशेषत: आगामी उत्सवांच्या आधी, मोठ्या मेळाव्याचे कडक नियमन सुनिश्चित करा.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नवीन ठिकाणांबाबतीत कंटेमेंटन झोन (Containment Zones – प्रतिबंधित क्षेत्र), बफर झोन (Buffer Zone-सुरक्षीत क्षेत्र) याची यादी तयार करा. तसेच वेळ न घालवता करता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व क्लस्टर नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठवा.
2 – चाचणी आणि लक्ष ठेवण्याबाबत, राज्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्येवर बारीक आणि कडक नजर ठेवण्यास सांगितले होते; यानुसार दररोज आणि प्रत्येक आठवड्याला रुग्ण पॉझिटीव्हीटी; दुपटीचा दर; आणि नव्याने जास्त रुग्ण वाढणारी ठिकाणे या भागात प्रतिबंध सुरू करा असे सांगण्यात आले. आरटी-पीसीआरचे योग्य प्रमाण सुनिश्चित करा: दररोज घेतल्या जाणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये आरएटी (किमान 60:40) असावे. हे 70:30 गुणोत्तरापर्यंत वाढवले जाऊ शकते.
3 – खाटांची संख्या वाढवावी, रुग्णवाहिकांसारख्या खात्रीशीर प्रवासी सुविधावर लक्ष पुरवावे, गरज पडल्यास रुग्णाला हलवण्यासाठीची व्यवस्थांची अंमलबजावणी करावी. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरळीत आणि गरज भासल्यास वापरात असण्याची खात्री करून घेत रहा. किमान 30 दिवसांचा औषधांचा साठा राखीव राहू द्या. सध्याच्या नियमावलीनुसार गृहविलगीकरण/अलगीकरण यांचे सक्तीने पालन करावे.
4 – लोकांना भयभीत कऱणारी माहिती देऊ नका. नागरिकांना वारंवार सूचना आणि माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहा, जेणेकरून भिती वा चुकीची माहिती पसरण्यास आळा बसेल. माध्यमांना नियमितपणे परिस्थितीबद्दल माहिती देणे.
5 – लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस देण्याला प्राधान्य द्या. तसेच ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांचेही लसीकरण तात्काळ करा. 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या तसेच दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या राष्ट्रीय स्तरावरील लसीकरणाच्या सरासरीपेक्षा कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणावर विशेष लक्ष देणे. ज्या ठिकाणाचं लसीकरण राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा कमी असेल तेथे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम तीव्र करणे. येत्या काळात ज्या राज्यात निवडणूका होणार आहेत त्या राज्यांनी तातडीने लसीकरणाला वेग देणे.