पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू……!
बीड दि.२८ – पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात ही दुर्देवी घटना घडली. सिद्धू धोत्रे, निलेश मुळे आणि प्रमोद जाधव अशी मृत्यू झालेल्या तिन्ही मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर धरणातून सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आलं आहे. त्यामुळे मखमलाबाद परिसरातील पाटाला पाणी आले आहे. याच पाटाच्या पाण्यात पोहोण्यासाठी परिसरातील काही मुले गेली होते. त्यांच्यासोबत सिद्धू, निलेश आणि प्रमोद हे तिघेही गेले होते. सर्व जण पोहोत असताना या तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघे जण पाण्यात बुडाले. सोबतच्या मित्रांनी तिघांनाही वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु, तिघांनाही वाचवण्यात मित्रांना यश आले नाही. जीवरक्षक दलाच्या जवानांनीही तत्काळ धाव घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनाही मुलांना वाचवण्यात यश आले नाही. कालव्यातील पाण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे पाण्याच्या खोलीचा मुलांना अंदाज आला नाही. त्यामुळे तिघेही बुडाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मखमलाबाद परिसरातील नागरिकांनी पाटावर एकच गर्दी केली. मृत्यू झालेल्या तिन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आक्रोश केला. या तिन्ही मुलांच्या मुत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.