कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला….…!
मुंबई दि.2 – आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज तब्बल 11 हजार 877 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 9 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 2 हजार 69 कोरोना रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचेही नवे 50 रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखीच वाढली आहे. राज्यातला आकडा तर 12 हजारांच्या जवळ गेल्याने चिंता वाढलीच आहे.
यापेक्षाही जास्त चिंता वाढवली आहे मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने. आज फक्त मुंबईतल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने 8 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त धास्ती आहे. राज्यात रोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. कोरोनाने हैराण केले असतानाच ओमिक्रॉननेही पाय पसरले आहेत, त्यामुळे दुहेरी संकट थोपवण्याचे आव्हान प्रशासनासह सर्वासमोर असणार आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्य सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. राजधानी मुंबईच्या प्रशासनाकडूनदेखील खरबदारी म्हणून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई मनपाने आगावीची तयारी केली आहे. शहरातील बीकेसी येथे जंबो व्हॅक्सिनेशन सेंटर उभारण्यात आले असून येथे 15-18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते.
दरम्यान, राज्यात सध्या होणारी कोरोना रुग्णांची वाढ स्फोटक असल्याने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून राज्यातले आणि मुंबईतले निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत, मात्र तरीही रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसून येत नाही, त्यामुळे हेच निर्बंध आणखी कडक होऊ शकतात.
तर पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यु देखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.