तोतया माणूस उभा करून केली फसवणूक, केज तालुक्यातील प्रकार……!
केज दि.10 – दुय्यम निबंधकांसमोर तोतया माणूस उभा करून सख्या भावांनी भावाच्या जागेचे खरेदीखत करून देत फसवणूक केल्याचा प्रकार केज तालुक्यातील सुर्डी ( सोनेसांगवी ) येथे घडला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील सुर्डी ( सोनेसांगवी ) येथील रसूल असरोद्दीन शेख यांची मांगवडगाव शिवारातील गट नं. १७९ / अ / १ मध्ये २० गुंठे जागा होती. त्यांचे भाऊ चाँद असरोद्दीन शेख, मज्जीत असरोद्दीन शेख, सलाम फतरु शेख, इलाही चाँद शेख, महादेव दत्तोबा अंकुशे यांनी संगनमत करून १६ जुलै २००३ रोजी केज येथील दुय्यम निबंधकांसमोर तोतया माणूस उभा करून रसूल शेख हे आहेत. असे भासवून त्यांच्या परस्पर २० गुंठे जागेचे खोटे व बोगस खरेदीखत करून रसूल शेख यांचे नुकसान व्हावे या उद्देशाने दृष्ट कृत्य करून फसवणूक केली. तसेच २५ ऑगष्ट २०२१ रोजी सुर्डी फाट्यावरील मुस्कान हॉटेलसमोर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद रसूल शेख हे ठाण्यात घेऊन गेले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी न्यायालयाच्या आदेशावरून चाँद शेख, मज्जीत शेख, सलाम शेख, इलाही शेख, महादेव अंकुशे यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार शेख हे पुढील तपास करत आहेत.