पावसासाठी पोषण वातावरण, राज्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट……!
मुंबई दि.१३ – गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतात जोरदार हिमवृष्टी झाली होती. हिमवृष्टी होत असल्यामुळे तेथील जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. त्यातच आता दक्षिण भारतातील ईशान्येकडील वारे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे देशात तामिळनाडूसह अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
पुढील दोन दिवसांत राज्यात कोरडं हवामान राहिल्यास विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 15 फेब्रुवारीला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलका पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत हवेतील तापमानात वाढ झाली आहे. राज्यात थंडी कमी होत असून किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे. वातावरणात अचानक बदल होत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश येथे पावसानं हजेरी लावली होती. त्यातच पुन्हा एकदा राज्यातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील ईशान्यकडील वारे सक्रिय आहेत. तामिळनाडू, पाँडेचरी, कराईकल, दक्षिण केरळ माहे परिसरामध्ये पोषक वातावरण निर्माण झालं आहे. या राज्यांमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 24 तासांमध्ये तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.