दोन महिलांनी मिळून एकास 14 लाखाला गंडवले…..!
बीड दि.10 – केंद्र सरकारमार्फत लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून ९० टक्के अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून परळी तालुक्यातील सारडगाव येथील एकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सदर प्रकरणी नाशिक येथील दोन महिलांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, प्रदीप शत्रुघ्न तांदळे (३६, रा.सारडगाव), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुमच्या संस्थेस भारत सरकारच्या लघु, सूक्ष्म व मोठ्या कर्ज योजनेंतर्गत ९० टक्के अनुदानावर लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर सारडगाव येथे येऊन पाहणी केली. यादरम्यान त्यांच्याकडून फोन पे च्या माध्यमातून तब्बल १४ लाख ५ हजार रुपये उकळले व नंतर प्रक्रिया उद्योगाला मंजुरी मिळाली ना अनुदान आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रदीप तांदळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून मनीषा देवीदास तंवर, स्मिता पांडुरंग बोडके (दोघी रा.नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि विशाल शहाणे करीत आहेत.