#Social
अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा……!
अंबाजोगाई दि.१३ – किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमात अंबाजोगाई शहरातील सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.
देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहानुभुती व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. या वर्षी या अन्नत्याग आंदोलनाचे सातवे वर्ष असून किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणारा मुख्य कार्यक्रम हा अंबाजोगाई येथे घेण्यात येणार आहे.
या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने राज्यभरातील किसान पुत्रांच्या वतीने पानगाव ते अंबाजोगाई ही साधारण ३० किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार असून यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किसान पुत्रांचा सहभाग राहणार आहे. सदर पदयात्रा १९ मार्च रोजी दुपारी १ वाजता अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येणार असून या पदयात्रेचे स्वागत शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता नगर परिषदेच्या आद्दकवी स्वामी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात राज्यभरातुन आलेल्या किसान पुत्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून अन्नत्याग आंदोलनाचा समारोप मेळावा संपताच सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमास किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या सह महराष्ट्रातील किसानपुत्र सहभागी असलेल्या नामवंत विचारवंतांचा सहभाग असणार आहे.
या सर्व कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परीसरातील सर्व सामाजिक, अराजकीय संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्थानिक संयोजक ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.