#Social
भूविकास बँकेच्या कर्जमाफीत ‘विश्वास’कारखाना 5 पाणी योजनांचा फायदा – आमदार मानसिंगराव नाईक…..!
शिराळा दि.१५ – (अमोल पाटील) – राज्य सरकारमार्फत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या भू विकास बँकेच्या कर्ज माफीत विश्वासराव नाईक कारखान्याने कार्यक्षेत्रात उभारलेल्या 5 पाणी योजनांना फायदा झाला आहे. त्यामुळे एकूण 1 हजार 16 शेतकऱ्यांची 44.74 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. ही माहिती विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, विश्वासराव नाईक कारखान्याने शिराळा व शाहूवाडी तालुका या कारखाना कार्यक्षेत्रात 15 पाणी योजना राबवून 10 हजार 500 एकर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. त्यामागे कारखान्याचे माजी अध्यक्ष, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांची दूरदृष्टी व योगदान आहे. महाआघाडी सरकारने सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भू विकास बँकेकडून घेतलेले कर्जास माफी दिली आहे. त्याचा फायदा कारखान्याने केलेल्या 5 योजनांखालील 1 हजार 16 शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांना एकूण 44.74 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
आमदार नाईक म्हणाले, कारखान्याने राबविलेल्या श्री भैरवनाथ सहकारी पाणी योजना, रिळे योजनेतील 300 सभासदांची 13.04 कोटी रुपये, श्री गणेश सहकारी उपसा जलसिंचन योजना, येळापूर कडील 297 सभासदांची 12.58 कोटी रुपये, श्री दत्त सहकारी पाणी पुरवठा योजना, वाडीभागाई कडील 123 सभासदांची 1.87 कोटी रुपये, श्री महादेव सहकारी पाणी पुरवठा संस्था, नांदगाव (ता. शाहूवाडी) 140 सभासदांची 9.39 कोटी रुपये, श्री शिवशक्ती सहकारी पाणी पुरवठा संस्था, आकुर्ळे (ता. शाहूवाडी) 153 सभासदांची 8.03 कोटी रुपये कर्जमाफी झाली आहे.
ते म्हणाले, यापूर्वीही राज्यात आघाडी सरकार असतना दिलेल्या कर्जमाफीत कारखान्याने राबविलेल्या योजनांना कर्जमाफी मिळून शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. राज्यातील महाआघाडी सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले व घेत आहे. सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकारचे काम सुरू आहे.