क्राइम
केज तालुक्यातील उसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला……!
केज दि.१५ – तालुक्यातील लहुरी येथील इसमाचा आर्थिक व्यवहारातून अपहरण करून खून करण्यात आला. मृतदेह पोत्यात गुंडाळून नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह सापडला असून सुधाकर हनुमंत चाळक (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय हिंदुराव देसाई
(वय ५८, रा. कडगाव, ता. भुदरगड), तुकाराम मुंढे (५२, रा. चारदरी, ता. धारूर, जि. बीड), रमेश मुंढे ४५, रा. कोठारबन, ता. वडवणी, जि. बीड) यांना केज पोलिसांनी अटक केली आहे.
ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी देसाई याने चाळक यांना सहा महिन्यांपूर्वी ११ लाख रुपये दिले होते. मात्र मजूर न पुरविल्याने देसाई याने पैशासाठी तगादा लावला. दरम्यान चाळक हे १६ फेब्रुवारीपासून गायब झाले होते. पोलिस तपासात मृत चाळक यांचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून नांगनूरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकण्यात आला आल्याचे उघड झाल्यानंतर संशयितांना घेऊन पोलिस नांगनूरच्या हिरण्यकेशी पुलावर सोमवारी दाखल झाले. त्यांनी गडहिंग्लजच्या रेस्क्यू टीमला घेऊन मृतदेहाचा शोध घेतला; सायंकाळी नदीपात्रात मृतदेह सापडला.
दरम्यान मृत चाळक यांचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी रात्री उशिरा नदीपात्रातून बाहेर काढला. मृतदेहाचे शिर धडावेगळे करून हातपाय बांधले होते. तर पायाला दगड बांधून मृतदेह पोत्यात घालून पोते नदीत टाकले होते.याप्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेश पाटील, पोना दिलीप गित्ते, अनिल मंदे, संतोष गित्ते हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.