आजपासून आयपीएल चा धमाका, पहिल्यांदाच खेळणार 10 संघ……!
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे वर्षभराच्या कालावधीने भारतात पुनरागमन होत असून शनिवारी सलामीच्या लढतीत गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत.
तसेच या वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असल्याने यंदाच्या ‘आयपीएल’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषत: गुजरात संघाचा कर्णधार व अष्टपैलू हार्दिक पंडय़ा संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपली तंदुरुस्ती राखतो का आणि गोलंदाजी करतो का, याकडे निवड समितीचे लक्ष असेल. त्याचप्रमाणे हार्दिकसह लखनऊचा केएल राहुल, दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत आणि चेन्नई सुपर किंग्स रवींद्र जडेजा हे भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे यंदाच्या ‘आयपीएल’बाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
गतविजेत्या चेन्नईला यंदाही ‘आयपीएल’च्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आपला उत्तराधिकारी म्हणून जडेजाची निवड केली. त्यामुळे आता अष्टपैलू जडेजावर कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी असेल. गेल्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ पटकावणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल. तसेच ४० वर्षीय धोनीचा हा अखेरचा ‘आयपीएल’ हंगाम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जडेजासह सर्वच खेळाडूंसाठी त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.
दरम्यान, गेल्या हंगामात ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाताने ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठली. मात्र, फलंदाज म्हणून अपयश आल्याने कोलकाताने त्याला संघात कायम ठेवले नाही. त्यांनी खेळाडू लिलावात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला मोठय़ा किमतीत खरेदी केले आणि त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. श्रेयसने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना यशस्वी कामगिरी केली. तो या यशाची पुनरावृत्ती करेल, अशी कोलकाता संघाला आशा आहे. श्रेयससह आंद्रे रसेल, सुनील नरीन, वेंकटेश अय्यर आणि वरूण चक्रवर्ती यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा कोलकाताच्या संघात समावेश आहे. कोलकाताला सुरुवातीच्या काही सामन्यांत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची उणीव भासेल.