#Social
विड्यात लळीत नाट्य महोत्सवाची शतकोत्तर परंपरा कायम…….!
केज दि.१६ – (विनोद ढोबळे) तालुक्यातील विडा येथे हनुमान जयंतीला सादर करण्यात येणाऱ्या लळीत नाट्य महोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. मध्ययुगीन कालखंडातील संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडविणाऱ्या या नाट्याचे कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे सादरीकरण झाले नव्हते. यंदा येत्या रविवारी हनुमान पालखीचे मिरवणूक होऊन पालखी सोहळ्याचे विसर्जन झाल्यावर ( दि. १७ ) मध्यरात्री १ वाजेपासून नाट्याचे सादरीकरण होणार असल्याने नाट्य रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
लोकरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची दिशा दाखवणारे लळीत नाट्याची महाराष्ट्रात प्रथम सुरुवात स्वामी रामानंद यांनी केली होती. सुरुवातीला अनेक ठिकाणी सादर होणारे लळीत आता काही मोजक्याच ठिकाणी यात्रा आणि उत्सवामधून सादर केले जाते. लळीताच्या नाट्य संहीतेला बाड म्हटले जाते. तर विडा येथील तत्कालीन नाट्य कलावंत धोंडीराम शास्त्री कोकीळ यांनी जालना जिल्ह्यात सादर होणाऱ्या लळीत कार्यक्रमाला भेट देऊन त्याच्या अवलोकनानंतर तेथेच हस्तलिखीत बाड तयार केले. हनुमान जन्मोत्सवात प्रथम ते सादर केले गेले. पुढे गावकऱ्यांनी ती परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. तर ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी विडेकरांनी एक लळीत मंडळ स्थापन केले.
लळीत नाट्यामुळे मध्ययुगीन कालखंडातील जाती व्यवस्था, बोलीभाषा, कार्य विभागणी आणि वेशभुषा आदी गोष्टी सोंगाच्या माध्यमातून दाखविल्या जातात. ब्राह्मण, फकीर, तुंबडीवाले, बहुरूपी, राजा, भाट, आराधी, गोंधळी, छडीदार, चोपदार, वाघ्या, मुरूळी अशी सोंग घेऊन लळीत नाट्य सादर केले जात आहे. नाट्याच्या माध्यमातून एकोपा आणि सामाजिक एकात्मीक दर्शन घडते. नाट्यात वृध्द कलाकारापासून ते युवक ही सहभाग नोंदविणार असून शिवाजी भुजबळ, रंगनाथ पटाईत, जगन्नाथ सुतार, शामराव पटाईत, बी, आर, देशमुख, संदिप भुजबळ, जोतीराम (राजाभाऊ) घोरपडे, गोविंद देशमुख, शंकर देशमुख, विनोद घूटे, शशिकांत विडेकर, दत्ता पटाईत, शहाजी घूटे, सचिन भुजबळ, राजा कुलकर्णी, अच्युत भालेकर, विलास गुरव, हरी कुलकर्णी, भिमा कदम, ढोलकी वादक राजाभाऊ देशमुख, रामलिंग कुंभार, मारुतीअप्पा घूटे, एकनाथ पटाईत या कलाकरांनी नाट्य महोत्सवाची जोरदार तयारी केली आहे. लळीत नाट्याचे रविवारी मध्यरात्री १ वाजेपासून सादरीकरण केले जाणार आहे.
दरम्यान, पालखी पुढे जास्ती जास्त सोंग घेण्याचं आव्हान लळीत नाट्य सादर करण्याच्या आधी गावभर पारंपरिक सोंग घेण्याची परंपरा आहे यात हत्ती, डोंबारी,तृतीयपंथी,शेतकरी, आराधी, अस्वल , भिकार, विविध प्रकारचे सोंगाचे सादरीकरण केले जाते सध्या सोंगचे प्रमाण कमी झाले असून जास्तीत जास्त सोंग घेण्याचे आवाहन राजा हनुमान कमिटीचे एकनाथ,पटाईत ,राजेभाऊ देशमुख, व सरपंच सूरज पटाईत यांनी केलं आहे