#Judgement
आज फैसला, निर्णयाकडे देशाचे लक्ष…..!
जवळपास महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष आज निर्णायक टप्प्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.
मागील महिन्यात जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. मात्र त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे. उद्धव यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करून शिंदे गटाने स्वत: ची कार्यकारणी स्थापन केली आहे. तर, मंगळवारी 19 जुलै रोजी लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांना हटवून राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत आहेत. लोकसभा अध्यक्षांनी या पत्राला मंजुरी देत हे राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. तर, शिवसेनेच्या प्रतोदपदी भावना गवळी यांना कायम ठेवण्यात आले आहे. शिवसेनेने राजन विचारे यांना प्रतोद म्हणून नेमले होते.