संपादकीय
वादळी वाऱ्यात झाडांसह पोल कोसळले…..!
केज दि.४ – मागच्या अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने केज तालुक्यात हजेरी लावली.पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी आनंदी आहे. परंतु शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यात झाडांसह पोल कोसळल्याने शहरात बहुतांश भागात जनजीवन विस्कळीत झाले असून गौराई सणाच्या दिवशीच अंधाराचे सावट आहे.
शनिवारी रात्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस जोरात असल्याने रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला. तर वादळी वाऱ्याने शहरातील उमरी रोडवरील झाडे कोसळल्याने रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.तर याच भागातील समता नगर मध्येही झाडांसह विद्युत पोल कोसळला आणि ऐन रोडवर आडवा झाला. संपूर्ण तारा रस्त्यावर पसरल्या तर त्या पोलमुळे दारातील झाडही कोसळले.मात्र रात्रीची वेळ असल्याने व सर्व लोक घरात असल्याने सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, आज गौराई सणाच्या दिवशीच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सणावर अंधाराचे सावट पसरले असून अद्यापतरी महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरुळीत करण्याची हालचाल दिसून येत नसल्याने अंधारातच गौरीपूजन करावे लागते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. नागरिक मात्र महावितरण ला जाग येण्याची वाट पहात आहेत.