शेतकऱ्याची बॅग कापून दोन मोबाईल, ४९ हजार पाचशे रुपयांची रक्कम लंपास…..!
केज दि.२२ – कृषी दुकानदाराची उधारी देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास वाटेत दोघांनी बोलत थांबवून ओळखीच्या दोघांनी बॅग कापून दोन मोबाईलसह ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना केज शहरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या पाठीमागील रस्त्यावर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील धर्माळा येथील शेतकरी दिनकर सखाराम गोडसे ( वय ४५ ) यांनी शेतातून काढलेले कोबीचे पीक अंबाजोगाई येथे विक्री करून ४९ हजार ५०० रुपये आले होते. ती रक्कम घेऊन २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केज येथील आदित्य कृषी सेवा केंद्राचे दुकानदार विलास जाधव यांची उधारी देण्यासाठी आले होते. मात्र ते दुकानावर नसल्याने त्यांनी आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते शहरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या पाठीमागील रस्त्याने गावाकडे जाणाऱ्या रिक्षा पॉईंटकडे निघाले होते. तेवढ्यात पाऊस आल्याने त्यांनी खिशातील दोन्ही मोबाईल काढून बॅगमध्ये ठेवले. पैसे व मोबाईल ठेवलेली बॅग बगलात धरून व भाजीपाल्याची पिशवी हातात धरून चालत जात असताना त्यांच्या ओळखीचे केज येथील दशरथ पवार व अरुण काळे हे दोघे पाठीमागुन आले. दशरथ पवार हा समोर उभा राहुन काय चालले काय नाही असे बोलून त्याने थांबुन धरले. अरुण काळे हा पाठीमागे जावुन त्याच्या बगलाला धक्का दिल्यासारखे केले. त्यांनी पाठीमागे बघुन काय केले असे विचारणा केली असता काही नाही असे म्हणून ते दोघे एकमेकांना इशारा करून निघून गेले. त्यानंतर दिनकर गोडसे हे घरी आले. त्यांनी बॅग बघितली असताना बॅग कापलेली आणि त्यातील दोन मोबाईल व ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम गायब झालेली होती. त्यानंतर दशरथ पवार, अरुण काळे या दोघांनी बॅगमधून मोबाईल व रक्कम काढून घेतल्याची खात्री पटली. दिनकर गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ पवार, अरुण काळे या दोघांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.