क्राइम

पिकअपला कार आडवी लावून दागिन्यांसह रोख रक्कम लुटली…..! 

1 / 100
केज दि.२७ – रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटपून खतगाव ( जि. नांदेड ) येथून पुण्याला परत निघालेल्या पिकअपला दरोडेखोरांनी कार आडवी लावून अडविले. पिकअपमधील नागरिकांना कोयत्यांचा धाक दाखवून पुरुषांच्या जवळील नगदी ८ हजार ३७० रुपये व महिलांच्या अंगावरील दागिने असा ७२ हजार ३७० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव फाट्याजवळ मंगळवारी ( दि. २७ ) पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध केज पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
     नांदेड जिल्ह्यातील खतगाव ( ता. मुखेड ) येथील धनाजी किसनराव भोसले हे खाजगी वाहन चालक असून त्यांचे कुटुंब हे कुरळी ( ता. खेड जि. पुणे ) येथे वास्तव्यास आहे. त्यांचे चुलते मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी धनाजी भोसले हे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईकांसह पुण्याहून पिकअपने ( एम. एच. १२ टि. व्ही. ३९०५ ) खतगावला २५ सप्टेंबर रोजी सकाळी आले होते. २६ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता सावडण्याचा कार्यक्रम आटपून परत त्याच पिकअपने धनाजी भोसले, त्यांची पत्नी अनुसया भोसले, मुलगा दत्ता भोसले, पुतणी अंबिका परशुराम यादव, शंकर जयसिंग भोसले, शंकर यादव, समर्थ शंकर यादव, माधव गोविंदराव टेकाळे, राम मारोती नखाते, विमलबाई गंगाधर घाटके हे सर्व जण पुण्याला निघाले होते. धनाजी भोसले स्वतः पिकअप चालवीत होते. तर २७ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचे पिकअप हे केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव फाट्यापासून थोड्या अंतरावार पुढे जात असताना पिकअपला एका  सिल्व्हर रंगाची कार पुढे येऊन आडवी लावून त्यांना आडविले. कारमधून हातात कोयते असलेले २५ ते ३० वयोगटातील पाच दरोडेखोर खाली उतरले. त्यापैकी एकाने पिकअपची चावी काढून घेतली. तर उर्वरित चौघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवीत माधव टेकाळे यांच्या डोक्यात उलटा कोयता मारून जखमी करीत दहशत निर्माण केली. त्यांनी बळजबरीने धनाजी भोसले यांच्या जवळील नगदी ७ हजार रुपये, डायरी, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, एटीएम कार्ड, अंबिका यादव यांच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र, कानातील फुले, अनुसया भोसले यांचे कानातील ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे फुले, विमल घाटके यांचे गळ्यातील २० हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसुत्र, शंकर भोसले यांचे पॉकीटातील नगदी १ हजार ३७० रुपये, क्रेडीट कार्ड, एटीएम, आधार कार्ड, पॅनकार्ड, लायसन्स असा एकुण ७२ हजार ३७० ऐवज काढून घेत कार परत वळवून अंबाजोगाई रस्त्याने निघून गेले. धनाजी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा दरोडेखोरांविरुद्ध केज पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
————————————————
दरोडेखोरांच्या अंगावर जीन्स पॅन्ट, पायात स्पोर्टस शुज
————————————————
कार चालकाच्या अंगावर पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट होती. दरोडेखोरांच्या अंगावर जर्किंग, जीन्स पॅन्ट, पायात स्पोर्टस शुज, तोंडाला काळ्या रंगाचा कपडा बांधलेला होता. कारमध्ये बसत असताना एका जणाच्या तोंडावरचा कपडा खाली आल्याने त्याचा चेहरा काळा सावळा, फ्रेंच कट दाढी, लांब मिशी, नाक सरळ असल्याचे दिसून आले. ते मराठीत बोलत होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close