#important
शिंदे – फडणवीस सरकारच्या आदेशाला केजच्या एका बँकेकडून केराची टोपली…..!
केज दि.२३ – राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दिवाळी अगोदर पगारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला व निधीची तरतूद ही केली.परंतु केज शहरातील एका बँकेच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे बँकेत पैसे येऊनही कर्मचाऱ्यांना पगारी मिळालेल्या नाहीत.
ईद असो वा दिवाळी सरकार सणासुदीला कर्मचाऱ्यांच्या पगारी करण्याचे निर्णय घेत आहे.त्याच पार्श्वभूमीवर या दिवाळीला २१ ऑक्टोबर च्या पूर्वी पगाराची तरतूद करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला. त्यानुसार निधीची तरतूद करून पैसे बँकेत पाठवण्यात आले.आणि ज्या त्या शाळा महाविद्यालयाने बँकेत चेक दिले आणि मेलही केले.परंतु केजच्या रोजा मोहल्ला एसबीआय (पूर्वीची हैदराबाद) शाखेने निम्म्या अर्ध्या कर्मचाऱ्यांच्या पगारी खात्यावर वर्ग करून बँकेला कुलूप लावून सुट्ट्यांसाठी निघून गेले.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणावर विरजण पडले.सलग चार दिवस सुट्ट्या आहेत आणि त्या दरम्यान दिवाळी संपते असे माहीत असूनही मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत काढता पाय घेतल्याने कर्मचारी वर्गात संतापाची लाट आहे.सरकारने तरतूद कशासाठी केली? असा प्रश्न निर्माण झाला असून यांना कोणी जाब विचारणारा आहे की नाही असा सवाल विचारल्या जात आहे.
तर सदरील बँकेत बहुतांश कर्मचारी हे बाहेर राज्यातील असल्याने संवादाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे.हिंदी भाषिक कर्मचारी असल्याने इथल्या ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची धड उत्तरेही मिळत नाहीत.त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक व पेन्सनर्स लोकांची कुचंबणा होत आहे.मोठा ग्राहक वर्ग असलेल्या या बँकेच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांची गरज नसल्याचे अनुभव येत आहेत.
दरम्यान, सदर प्रकरणी केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्याकडे तोंडी तक्रार करण्यात आली असून ते या प्रकरणी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष आहे.परंतु सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने कर्मचारी मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत एवढे मात्र खरे…….!