आता पैशाअभावी सोडावे लागणार नाही शिक्षण….!
देशभरात लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं, परंतु आर्थिक अडचणींमुळं त्यांना त्यांचं शिक्षण मध्यभागी सोडावं लागतं. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी मोदी सरकारनं प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना आणली आहे.या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता 9 वी, 11वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून 75 हजार ते 1.50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. यासोबतच विद्यार्थ्यांच्या राहण्यापासून ते जेवणाची व्यवस्थाही मोफत केली जाते. या योजनेंतर्गत गावातील शेतकरी, गरीब, वंचित कुटुंबांच्या दारात शिक्षणाची ज्योत पोहोचविण्याचं काम केलं जात आहे. मात्र ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही आजपर्यंतची सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना आहे. या अंतर्गत इयत्ता 9 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 75000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचबरोबर इयत्ता 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील.
ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावं लागलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं, प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच लाभ दिला जातो. शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी पुन्हा फॉर्म भरावा लागतो. या दरम्यान, बँकेच्या पासबुकची छायाप्रत जोडणे देखील आवश्यक आहे.