आरोग्य व शिक्षण
राज्यात सुमारे 30 हजार शिक्षकांची होणार भरती…..!
सुमारे 29,600 शिक्षकांची पदे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त आहेत. या शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी-2023 मध्ये शिक्षक पात्रता चाचणी (टेट) होणार असून, निकाल मार्चमध्ये जाहीर केला जाईल. मेरिटनुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलद्वारे जूनपूर्वी थेट नियुक्ती दिली जाईल. राज्यात गेल्या चार वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लवकरच शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले आहे.
पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’, तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होईल. त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. परीक्षेच्या नियोजनासंदर्भात शालेय शिक्षण विभाग उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल,परंतु त्यासाठी वित्त व नियोजन विभागाचा ‘हिरवा कंदिल’ मिळणे आवश्यक आहे.