क्राइम
केज पोलिसांनी तिघांना मुद्देमालासह घेतले ताब्यात…..!
केज दि.९ – केज शिवारातून दोन शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील ३८ हजार ३३५ रुपयांच्या दोन विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना ५ जानेवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करीत तिघांना चोरी केलेल्या विद्युत मोटारीसह ताब्यात घेतले. या तिघांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केज शहरातील समर्थ नगर भागातील बाबुराव गणपती मोरे यांची शिवारातील सर्वे नं. ६३ मध्ये सात एकर जमीन असून ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत विहिरीतील पाणी गहू पिकाला दिले. त्यानंतर ६ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बाबुराव मोरे यांच्या विहिरीवरील १५ हजार ३७० रुपये किंमतीची ५ एचपीची विद्युत मोटार व त्यांचे शेजारी शेतकरी आश्रुबा रामभाऊ निंगुळे यांच्या शेतातील विहिरीवरील २२ हजार ९६५ रु. किंमतीची विद्युत मोटार चोरून नेल्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर बाबुराव मोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, केज पोलीस ठाण्याचे प्रमुख शंकर वाघमोडे, जमादार श्रीकांत चौधरी यांनी तीन दिवसात चोरट्याचा तपास लावून तालुक्यातील कानडी माळी येथील लहू चंद्रकांत राऊत, रमेश पांडुरंग राऊत, सुरज नवनाथ राऊत या तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन्ही विद्युत मोटारी हस्तगत करीत त्यांना न्यायालयासमोर हजर केले. या तिघांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.