क्रीडा व मनोरंजन
केज तालुक्यातील शेतमजुराचा मुलगा मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत…..!
डी डी बनसोडे
February 9, 2023
केज दि.९ – तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील शेतमजुर कुटुंबातील समाधान श्रीरंग गालफाडे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पदवीचे शिक्षण घेत असताना मराठी चित्रपट सृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेत पहिले पाऊल टाकले आहे. अभिनेत्याची मुख्य भूमिका असलेल्या ‘आधान’ नावाच्या मराठी चित्रपटातून त्याने प्रदार्पण केले असून या चित्रपटाचा पहिला प्रिमियर शो कळंब ( जि. उस्मानाबाद ) येथील पृथ्वीराज चित्रमंदिर या टॉकिजमध्ये २३ ऑक्टोबर रोजी पार पडला.
चिंचोलीमाळी येथील समाधान श्रीरंग गालफाडे याचे आई – वडील मोलमजुरी करीत असून त्याने प्रतिकूल परिस्थितीत पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला मराठी चित्रपटात करिअर करण्याची संधी देवळाली ( ता. कळंब ) येथील संतोष उध्दव एडके यांनी निर्मिती केलेल्या ‘आधान’ नावाच्या मराठी चित्रपटातून मिळाली आहे. या चित्रपटात समाधान याने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली असून ए. आर. मुव्हिज् प्रस्तुत व लता फिल्म प्रॉडक्शन या संस्थेने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बार्शी तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात करण्यात आले आहे. सहनिर्माता डॉ. दत्ता तपसे, डॉ. स्नेहा बनकर, गजानन बोळंगे ( रेड्डी ) हे असून दिग्दर्शक, कथा, गितकार, छायाचित्रन, रोशन उध्दव एडके यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद रोशन एडके, विनोद एडके यांनी केले आहे. संगीत व पार्श्व संगीत मितेश चिंदरकर यांनी तर गायक मितेश चिंदरकर व गायिका अपूर्वा नानेवाडेकर यांनी चित्रपटाचे गित गायले आहे. संकलन, डी. आय. व्ही.एफ.एक्स श्रावण बोराडे (कॉन्फिडन्स फिल्म स्टुडिओ) यांनी केले असून कार्यकारी निर्माता व नृत्य दिग्दर्शन संदिप शामराव पाटील यांनी केले आहे. लाईन निर्माता नानासाहेब जाधव हे आहेत.
चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून राजेश्वरी खोसे पाटील ( उस्मानाबाद ) हिने चित्रपट क्षेत्रामध्ये पहिल्यादांच पदार्पन केले आहे. तर सह अभिनेता म्हणून अविनाश शिंदे तर इतर कलाकार म्हणून वैष्णवी पटणे, उत्कर्ष आव्हाड, रोशन एडके ( जि. उस्मानाबाद ), भिमा जोगदंड, दिलीप ढगे, अलका घुगे, प्रभुदास दुप्ते ( लातुर ), अंजली पवार, आनंद खुणे, पांडुरंग कदम, मुठाळ, उमेश पाटील, श्रीमती जगदाळे, आदेश तांबी, पूजा लवटे, रोशन एडके, अक्षय शिंदे, बापू एडके, विघ्नेश एडके ( सर्व रा. बार्शी ), जयश्री बिलिंगे ( नातेपुते ), सचिन कांबळे, हर्ष कांबळे ( सोलापूर ), गजानन बोळंगे (रेड्डी), गणेश रामपुरी ( भुम ), करण गायकवाड, नानासाहेब जाधव, अशिष वाघमारे ( सांगोला ), सखाराम गिरी स्वामी (करकम), मूद्र शेठे ( पंढरपूर ) सचिन जाधव ( मंगळवेढा ) यांची भूमिका आहे. तर ‘आधान’ हा मराठी चित्रपट शुक्रवार दि.१० फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.