#Judgement
गळा दाबून गर्लफ्रेंडला जाळल्या प्रकरणी 25 वर्षीय तरुणाला जन्मठेप…..!
बीड दि.१० – लग्न न करता दोन वर्ष सोबत राहिल्यानंतर प्रियकराने आपल्या गर्फफ्रेंडवर इतरांसोबत अफेअर असल्याचा संशय घेतला. यातूनच त्याने पुण्यातून बीड जिल्ह्यात आणत तिला पेट्रोल टाकून जाळले. याच प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी हा निकाल दिला.
अविनाश रामकिशन राजुरे (वय २५ रा.शेळगाव ता.देगलूर जि.नांदेड) असे शिक्षा झालेल्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. सावित्रा दिगंबर अंकुलवार (वय २२) व अविनाश हे एकाच गावातील आहेत. दोघांचे प्रेम जुळले आणि ते घरातून पळून घोडनदी (ता.शिरूर जि.पुणे) येथे आले. दोन वर्षे ते पती-पत्नी असल्यासारखे सोबत राहिले. १३ नोव्हेंबर २०२० साली अविनाशने सावित्राला परळी व औढांनागनाथ येथे फिरायला जायचे असे सांगितले. बीड तालुक्यातील येळंबघाट येथे त्यांनी एका खदानीत मुक्काम केला. याच ठिकाणी १४ नोव्हेंबर रोजी ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्याने सावित्रा झोपेत असतानाच तिचा गळा दाबला. तसेच सोबत आणलेले पेट्रोल व ॲसिड टाकून तिला जाळले. ती मयत झाली, असे समजून त्याने तेथून पळ काढला.
दरम्यान, सकाळी हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला आणि त्याने नेकनूर पोलिसांना माहिती दिली. पीडितेला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तिचा मृत्यूपूर्व जबाबही घेण्यात आला. परंतू अवघ्या काही तासांतच तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी अविनाश विरोधात नेकनूर ठाण्यात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, केजचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, नेकनूरचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक व्ही.ए.जाधव यांनी तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. याचा निकाल शुक्रवारी लागला. यात जिल्हा व सत्र न्या.एच.एस.महाजन यांनी अविनाशला जन्मठेप व ५ हजा रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.अजय दि.राख यांनी काम पाहिले. त्यांना माजी सरकारी वकील ॲड.मिलींद वाघीरकर यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकरी उपनिरीक्षक बी.व्ही.जायभाय, सी.एस.सांगळे, परमेश्वर सानप यांनी काम पाहिले.