संपादकीय
दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या, आता पुढे काय….?
दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जरी नसले तरी पालकांना पुढच्या शिक्षणाचे वेध लागलेले असतात. दहावी झाल्यानंतर कुठे क्लास लावायचे ? मुलाला कुठे ठेवायचे ? याचा विचार सतत पालकांच्या मनामध्ये असतो. तर बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढे कुठल्या कोर्सला पाठवायचे याचे विचार मंथन सुरू असते. मात्र यामध्ये विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीचा कसल्याही प्रकारचा विचार बहुतांश पालक करताना दिसत नाहीत. जेवढा अभ्यास महत्त्वाचा आहे तेवढेच आपल्या पाल्यामध्ये काही कलागुण असतील तर त्यालाही प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र दिवसेंदिवस हा विचार मागे पडू लागलेला आहे.
इतर क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही कमालीची स्पर्धा झालेली आहे. एकमेकांचे बघून आणि एकमेकांची तुलना करून आपल्याही मुलाने किंवा मुलीने त्याच प्रकारे शिक्षण घ्यावं आणि तशाच पद्धतीचा कोर्स निवडावा याचा जणू काही अट्टाहास झालेला आहे. अगदी दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासूनच पालक पाल्यांच्या शिक्षणासाठी चिंतेत असलेले दिसून येत आहेत. जे वय खेळण्याबागडण्याचे आहे, मुक्तपणे जीवन जगण्याचे आहे अशा वयामध्येच लहान लहान बालकांच्या पाठीवर त्याच्या वजनाच्या दुप्पट ओझे लादल्या जात आहे. आणि यामुळे बालक ज्या प्रकारे वाढायला पाहिजे तशी न होता ते अगदी कमी वयातच कोमेजून जाऊ लागलेले आहे. मात्र याचा विचार कुठेही होताना दिसत नाही. आपल्या मुलाला मुलीला चांगल्या चांगल्या शाळेमध्ये घालायची आणि वाटेल तेवढी फी भरायची. मग त्या पाल्याचा बुद्ध्यांक किती आहे ? त्याला आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे ? याचा विचार न करता पालक अगदी आपल्या मनामध्ये जे आहे तेच करू लागलेले आहेत. आणि त्यामुळे बालकांच्या आवडीनिवडी त्याला कसल्याच प्रकारचे प्रोत्साहन मिळत नाही. आज आपण पाहतो भरमसाठ फी भरून पालक मुलांना तथाकथित शाळेत पाठवू लागलेले आहेत. कुठल्या शाळेत पाठवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपल्या मुलाचा बुद्ध्यांक पाहून त्या मुलाला झेपेल असाच अभ्यासक्रम निवडावा याचा विचार मात्र होताना दिसत नाही.
नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत. आणि आता उन्हाळा सुरू आहे मात्र उन्हाळ्याची सुट्टी ही पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना कसल्याच प्रकारची मिळत नाही. पूर्वी परीक्षा झाली की अगदी दोन ते तीन महिने विद्यार्थी मुक्तपणे वावरत होते, आपल्या आवडीनुसार वेगवेगळे छंद जोपासत होते. मात्र आता ते होताना दिसत नाही. दहावीची परीक्षा सुरू असतानाच अकरावी बारावी साठी मुलाला कुठे ठेवायचे, कुठले क्लास लावायचे याचा विचार पालक करत असतात. आणि परीक्षा झाली की लागलीच त्याला कुठेतरी क्लासेस ला जुंपल्या जाते. त्याला कुठल्याच प्रकारचा मोकळा श्वास घ्यायला मिळत नाही. त्यामुळे बालकांच्या मनावर सतत दडपण आहे. आणि त्या दडपणाखालीच मुलं वावरू लागलेले आहेत. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची आवड न पाहता पालकांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या बिनधास्तपणे आपल्या पाल्यावर लादल्या जाऊ लागलेले आहेत. आपल्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे इंजिनिअरच झालं पाहिजे असा जो अट्टाहास पालकांचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांच्या पुढे आपलं मत मांडणं शक्य होत नाही. आणि त्याला त्याच्यामध्ये आवड जरी नसली तरी पालकांचा अट्टाहास आहे म्हणून तो नाविलाजाने त्या अभ्यासक्रमाकडे वळतो. मात्र त्याला मुळातच त्याची आवड नसल्याने त्याचा अभ्यास म्हणावा तसा होत नाही आणि मग पदरी पडते ती निराशा ! आणि या निराशे मधून पालखी अगदी गोंधळून होऊन जातात आणि विद्यार्थीही खचून वेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. हे बऱ्याचदा समाजामध्ये दिसून येते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना कुठल्या कलेची आवड, उदाहरणार्थ गायन असेल वादन असेल याचाही विचार आणि त्या छंदाला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम हे झालं पाहिजे. मात्र तसे न होता फक्त अभ्यास, दिवसभर क्लासेस रात्री अभ्यास त्यामुळे खेळण्याबागडण्याच्या वयामध्येच मुलं अगदी पोक्त झाल्यासारखी दिसू लागलेले आहेत. याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. अभ्यास महत्त्वाचा आहे परंतु त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी व त्याचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी छंद आवड या ही जोपासणे तेवढेच गरजेचे आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जाणे हे तर आता कालबाह्य झालेले आहे. कारण मामाला ही वेळ नाही आणि पालकांना तर नाहीच नाही. आणि पालकांच्या या सर्व इच्छा आकांक्षामध्ये विद्यार्थी मात्र भरडू लागलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा याचाही पालकांनी थोडाफार विचार करणे गरजेचे आहे.