ब्रेकिंग
अखेर उमरी रस्त्याच्या उद्घाटनाला सापडला मुहूर्त…..!
केज दि.२६ – मागच्या पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर अखेर उमरी रस्त्याच्या बांधणीला मुहूर्त सापडला आहे. मंजूर झालेल्या निधीतून उमरी रस्त्याचे उद्घाटन येत्या बुधवारी म्हणजेच दिनांक 29 रोजी होणार असून सदरील रस्त्यावरील प्रभाग पाच आणि सहा तसेच इतर भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागच्या कित्येक वर्षांपासून उमरी रस्ता बांधवा यासाठी नागरिकांसह संघर्ष समितीच्या वतीने कित्येकदा आंदोलने करण्यात आली. आंदोलनानंतर प्रत्येक वेळेस केवळ आश्वासने दिली. मात्र उशिरा का होईना सदरील भागातील नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले असून उमरी रस्त्याचे उद्घाटन दिनांक 29 मार्च रोजी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा तसेच भाजपाचे जेष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो नागरिक राहतात. अत्यंत दयनीय अवस्थेत असलेला हा रस्त रहिवाशांना चालण्या लायक सुद्धा राहिलेला नव्हता. वाहन तर सोडाच परंतु पायी चालणे सुद्धा मुश्किल झालेले होते. कित्येक शालेय विद्यार्थी या रस्त्याने सायकलवर जाताना पडून जखमी झालेले आहेत. तर वयोवृद्ध लोकांनाही कमालीचा त्रास होत होता. मात्र काही का असेना आता उद्घाटनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता रस्ता होणार असा विश्वास सदरील प्रभागातील रहिवाशांना झाल्याने दोन्ही प्रभागातील रहिवासी आनंदीत झाले आहेत.
सदरील रस्त्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासन तसेच संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिली आहे. मात्र सदरील उदघाटन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सदरील पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सीता बनसोड, उपनगराध्यक्ष शीतल दांगट तसेच गटनेते हारून इनामदार हे उपस्थित राहणार आहेत.