संपादकीय
उमरी रस्त्यावर मार्किंगचे काम पूर्ण……!
केज दि.१२ – मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केज शहरातून जाणाऱ्या उमरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. काम सुरू करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेने मोजमाप करून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत मार्किंग करून घेतली आहे. मात्र जिथपर्यंत मार्किंग केली आहे त्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे मोजमापात दिसत आहे.
केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा यांना जोडणारा प्रमुख असा उमरी रस्ता आहे. दोन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक वस्ती झालेली आहे. दिवसेंदिवस नवीन वसाहती वाढत आहेत. मात्र त्या सर्व वसाहतींना जोडणारा उमरी रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत होता. मात्र केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले तसेच दोन्ही प्रभागातील नागरिकांनी वेळोवेळी यासाठी आंदोलने केली, पाठपुरावा केला आणि सुमारे पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कामाला मुहूर्त लागला. दोन मे रोजी सदरील कामाचे उद्घाटन नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले. यावेळी दोन्ही प्रभागात राहणारे रहिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष सीता बनसोड, गटनेते हारून इनामदार तसेच मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करताना सदरील रस्ता हा अतिशय दर्जेदार करण्यात येणार असून दोन्ही बाजूला जर अतिक्रमण झालेले असेल तर ते रहिवाशांनी काढून घ्यावे अशी विनंती केली. अन्यथा कायदेशीर कारवाई करून सदरील अतिक्रमण काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान दिनांक ११ मे रोजी संबंधित यंत्रणेने काम सुरू करण्यासाठी मार्किंग केली. आणि त्या मार्किंग दरम्यान अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे उघड झालेले आहे. कुणाचे कंपाऊंड वॉल, कुणाच्या पायऱ्या तर कुणाचे छत सुद्धा पुढे आलेले आहे. काम तर उद्या सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्याप संबंधित रहिवाशांनी अतिक्रमानाबद्दल कसल्याही प्रकारचे पाऊल उचलले नसून नगरपंचायत प्रशासनाला आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करून अतिक्रमण हटवण्याचे मोठे आव्हानात्मक काम करावे लागणार आहे.
सदरील रस्ता हा कागदोपत्री 33 फुटाचा आहे. दोन्ही बाजूने नाल्या होणार आहेत. आणि म्हणून दोन्ही बाजूला ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे ते काढणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा अतिक्रमण तसेच ठेवून रस्ता करण्याचा प्रयत्न झाला तर यापुढे कधीच ते अतिक्रमण हटणार नाही असे नागरिक स्पष्ट बोलताना दिसत आहेत. त्यामुळे कुणाचे कितीही अतिक्रमण मोठे असेल, कुणाची कितीही इमारत मोठी असेल आणि ती जर अवैध असेल तर ती हटवण्याचं काम नगरपरिषद पंचायत प्रशासनाला करणे गरजेचे आहे. अन्यथा वागण्यालायक रुंदीचा रस्ता सुद्धा होणे कठीण आहे. त्यामुळे ज्या ज्या रहिवाशांचे रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे त्यांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असून कसल्याही प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ नये अशी अपेक्षा आहे.